गंगापूर, (प्रतिनिधी): नगर परिषद कार्यालयासमोर ११ महिन्यांचा थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी नगर परिषदेचे कंत्राटी कर्मचारी विकास विजय खाजेकर यांनी १४ ऑगस्टपासून सुरू केलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी मागणी मान्य झाल्यानंतर सोडविण्यात आले.
खाजेकर यांनी ११ महिन्यांचा पगार थकीत असल्याने तो तातडीने अदा करण्यात यावा, या मागणीसाठी नगर परिषद
कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. सलग तीन दिवस सुरू असलेल्या उपोषणाची गंगापूर नगर परिषदेने दखल घेतली.
संबंधित कर्मचाऱ्याची मागणी मान्य करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्यानंतर सोमवारी (दि. १७) उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संजय जाधव, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, मुख्याधिकारी संतोष आगळे, गटनेते संतोष अंबिलवादे, नगरसेवक अख्तर सय्यद, बाबा भिवसाने, काकासाहेब कोळसे, संदीप खाजेकर, बापू खाजेकर, सुनील खाजेकर आदी उपस्थित होते.
नगर परिषद प्रशासनाने मागणीची दखल घेतल्याने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची अखेर सांगता झाली. यामुळे विकास खाजेकर यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.













